तुडुंब भरली भातखाचरे... कोसळू लागले धबधबे... भंडारदर्यात सुरु झाले धारानृत्य !
माहेराला आल्यागत मोसमी पाऊस आता भंडारदरा परिसरात रमला आहे. अवघ्या सृष्टीशी त्याचे गुज सुरु आहे.चैतन्याचा दाता असलेल्या पावसाने बघता बघता सृष्टीचे अवघे रुपडेच बदलून टाकले आहे.माणसाच्या चित्तवृत्ती प्रसन्न करणारी चैतन्याची सळसळ सगळीकडे जाणवू लागली आहे.कळसुबाई-हरिश्चंद्रगड यासह सह्यगिरीतील लहान मोठी शिखरे,डोंगरमाथे अनेकविध जलरंगांच्या छटांमध्ये न्हाऊन निघत आहेत.चिंब चिंब पावसाने रान आबादानी झाले आहे. नेहमीपेक्षा यंदा पाऊस तसा अगदी वेळेवर दाखल झाला.तळकोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून तो जसजसा घाटघर-कळसूबाईच्या दिशेने सरकायला लागला,तसा येथला निसर्ग चैतन्याने मोहरून गेला आहे.टपोर्या थेंबानी ओघळणारा पाऊस,धुक्यात हरवलेल्या पर्वत-शिखरांवरून झेपावणारे सहस्रावधी प्रपात,लालसर विटकरी पाण्याने तुडुंब भरलेली भातखाचरे.पठारांवर दाटीवाटीने उगवलेले बारीक -बारीक हिरवे-पोपटी गावात,भन्नाट रानवारा आणि जोडीला मस्त गारवा...निसर्गशिल्पांचे देखणे कोंदण लाभलेल्या भंडारदरा परिसरात असे हे परिपूर्ण निसर्गचित्र अवतीर्ण झाले आहे.त्यामुळे उन्हाळ्यातील रुक्ष वातावरण कुठल्या कुठे पळून गेलेय. भंडारदर्याच्या पावसाला मुळातच एक नाद आहे.लय आहे.सूर आहे...म्हणूनच त्याचे येणे अनेकांच्या दृष्टीने आनंदाचे गाणे होऊन जाते.त्याच्या येण्याची वाट अनेकजण आतुरतेने पाहत असतात.त्याच्या येण्याबरोबर येथे जलोत्सव सुरु होतो.या अनोख्या धारानृत्याचा मनमुराद आनंद लुटताना सारे सारे विसरून जातात...चिंब भिजतात....स्वताला विसरतात.असा हा ऋतू हिरवा... ऋतू बरवा...आता आपल्याला पावसाळी रानभूल घालतो आहे.खुणावतो आहे...
Wednesday, June 16, 2010
Saturday, June 12, 2010
भंडारदाराचा सूर्यास्त ...अस्ताचलास इथे रविबिम्ब टेकलेले ...अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या भंडारदारा परिसरातिल सुर्यास्ताचा हा मनोहारी देखावा.आपल्या सुन्दरतेने हा येथला निसर्ग अनेकाना साद घालित असतो.निसर्ग शिल्पांचे सुन्दर कोंदन लाभलेल्या भंडारदरयाचे सौंदर्य अशा सायंकाली आनखिनच खुलुन दिसते.
Subscribe to:
Posts (Atom)