Thursday, May 12, 2011


वसंत ऋतुतला फुलोत्सव...

वसंत ऋतू म्हणजे चैतन्याची आनंददायी लहरच जणू.त्याच्या येण्याने अनेकानेक फुलझाडाना फुलण्याचे,उमलण्याचे डोहाळेच लागतात जणू...सध्या वसंत ऐन भरात आहे. निरनिराळ्या फुलांचा वसंत उत्सव बहरला आहे.नानाविध रूप,रंग,गंध आणि आकाराची फुले रुक्ष ,रखरखीत वातावरणात लक्ष वेधून घेत आहेत. मग भगभगीत वाटणारे वातावरण... तापलेली उन्हे हे सारेदेखील काहीसे सौम्य, शीतल वाटू लागते...काळोख्या रात्री एखादी मशाल आपले लक्ष वेधून घेते ना अगदी तशी...तशीच ही फुले आपले लक्ष वेधून घेतात अगदी दुरूनही ...
ऋतू आपली कुस बदलतो, तशी सृष्टिची रुपेही बदलत जातात.त्यांच्या लावण्य विभ्रमाचे अनोखे जग पुढ्यात येउन उभे राहते.निसर्गाच्या कुंचाल्यातून साकारलेल्या मोहमयी चित्रलिपिचे रहस्यही मग आपोआप उलगडत जाते.
हासरा,नाचरा,लाजरा,सुन्दर साजिरा अशा अनेकानेक विशेषणांनी ज्याचे वर्णन केले जाते,श्रावणाची असते तशी वसंताचीही एक साखळी असते. फाल्गुन,चैत्र अणि वैशाख हे तीन महिने म्हणजे वसंत ऋतूच्या अनेकानेक रंगानी नटलेले अणि प्रखर उन्हाने तापलेले...यातला चैत्र म्हणजे खराखुरा वसंत आत्मा...त्याच्या येण्याचे अवघ्या सृष्टिला जणू डोहाळेच लागलेले असतात..निसर्गराजा निरनिराळ्या रंगांची मुक्त हस्ते उधळण करू लागतो.
इवलाल्या पालवीच्या नाजूक-कोमल पानांनी झाकलेल्या पुष्पांनी डवरून गेलेल्या वृक्ष-लतांचे दर्शन सध्या जिकडे तिकडे घडते आहे.पाना-फुलांची ही सुकुमार शोभा सृष्टीवर अत्यंत उत्कटतेने अवतरली आहे.चैत्राच्या या पालवीचे रूपही मोठे मनमोहक असेच असते.पिंपळाची गर्द गुलाबी पाने नुसती पाहण्यातही मोठी मौज असते.तऱ्हे तऱ्हेच्या झाडांना छानदार पालवी फुटली आहे.चैतन्याची विलक्षण साक्ष ती देते आहे.या पालवीच्या सोबत अनेकाने रंगाची,रुपाची,आकाराची,सुवासाची फुले सृष्टीच्या सौंदर्यात आपल्या परीने भर घालीत आहेत.
या सगळ्यात सर्वाधिक कोण नटले आहे ? तर ती आहे घाणेरी...एरवी तिच्याकडे कोणाचे विशेष लक्षही जात नाही. पण सध्या ती अशी काही शृंगार करून बसली आहे की,नाजूक-साजूक शोभिवंत फुलांचा साज तिचे सौंदर्य वाढवतो आहे.वसंत म्हणजे घाणेरीचा साक्षात सखाच जणू...आणि आपल्या प्रियकराच्या आगमनाने ती अक्षरशः अंगाअंगाने मोहरली आहे.मधूनच येणारा खट्याळ वारा जणू तिची खोडी काढतो आहे.तिला चिडवतो आहे.कडूनिंब आपल्या पांढऱ्या तुर्यांनी लक्ष वेधून घेतो आहे.नाजूक फुलाचा शिरीष तर दुरूनच आपल्या अस्तित्वाची साक्ष देत उभा आहे.त्यचा तो घमघमाट एक मंद-धुंद सुवासिक झुळूकच अंगावरून गेल्याचे समाधान देत आहे.त्याच्या फुलांभोवती किती मधमाशा,भुंगे रुंजी घालीत आहेत.च्फ्याच्या निष्पर्ण फांद्यातून दांडोरे बाहेर पडले आहेत.काळ्या उमलताहेत.फुलताहेत. हळूहळू उभे झाडच फुलून गेलेय.त्याचा गंध पुलकित करतो आहे.
पांगारा,पळस,काटेसायर आणि चाफ्याचे पुष्पवैभव अपूर्व असेच असते.अंगार फुलल्याचा आभास हे फुले निर्माण करतात.ग्रीष्मात झलेली पानगळ...तापलेली उन्हे...ओसाड,भकास रान...वसंतातल्या पुष्प्न्रुत्याच्या रंगमंचाला पार्श्वभूमी असते ती अशी ती अशी भगभगीतपणाची... रुक्षपणाची...आणि त्यामुळेच हा रंगविलास अधिकच खुलतो...उठून दिसतो....काळोख्या रात्री एखादी मशाल आपले लक्ष वेधून घेते ना अगदी तशी...तशीच ही फुले आपले लक्ष वेधून घेतात अगदी दुरूनही ...
आंब्याच्या लांब लचक देठांना कैऱ्यांचे घ्होस लगडलेत. क्वची झाडे पाडी लागली आहेत.येता- जाता राघू या झाडांना लागलेल्या फळांवर चोच मारून ती पाडाला लागलीत का, याची खात्री करती आहेत.हे दृश्य केवळ पाह्ण्याठी एक गम्मत असते.करवंदीच्या जाळ्यांतून गोलाकार,गर्द निळी करवंदे डोकावताहेत.अंजन वृक्षाची निळाई ,नवलाई चकित करते.हळदीचा रंग ल्यायलेली पिवळ्याधमक फुलाची श्रीमंती आणि ते ऐश्वर्य मनामनाला मोहिनी घालतेय.मोगरा,जाई-जुईची सुवासिक फुले आणि रातराणीचे तुरे चांदण्या रात्रींना सुगंधित करीत आहेत.वसंतातले हे पुष्प-सम्मेलन पाहून आपण आचंबित होतो.निसर्गाने प्रत्येक झाला अलौकिकत्व बहाल केल्याची साक्ष मनोमन पटते.ही पालवी,ही फुलं आपल्याला बोलावताहेत हात पालावताहेत...
जोडीला कोकीळा 'पंचम' आळवते आहे.सारे पक्षी जणू मिलनाची गाणी गात आहेत. निसर्गाचा हा विराट खुलेपणा सारा निसर्गाविष्कार असा उघड्यावर पाडला आहे.आपल्या पुढ्यात उभा आहे.जे वसंताचे आहे त्याला चैत्रामागून येणारा वैशाख पूर्णत्व देतो.त्यामुळेच जणू चैत्रभर मुके असलेले गुलमोहराचे झाड आता आनंदभराने फुलले आहे.तांबड्याजर्द फुलांचे वेह्दक गुच्छ डोईवर घेऊन नाचते आहे.
आव्हान वसंताची भैरवी आता रंगात आलेली असते.साऱ्या चारचार सृष्टीला आता वेध लागलेत ते वर्षा राणीच्या आगमनाचे....

Saturday, May 7, 2011

आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे

परकीय सत्तेशी प्राणपणाने लढ़नारया आदिवासी महादेव कोळी जमातीच्या बंडखोरांनी आणि त्यांच्या नायकांनी स्वातंत्र्य चलवलित मोठे योगदान दिले आहे. राघोजी भांगरे हा या परंपरेतील एक भक्कम, ताकतवान, धाडसी, रुबाबदार आणि बंडखोर नेता होता. तुघलग आणि बहामनी सुलतानाच्या कालापासून इंग्रजी राजवतीच्या अखेर पर्यंत च्या कालातील बंडाच्या प्रदीर्घ परंपरेतील महादेव कोळी या आदिवासी जामातीतील राघोजी भांगरे( भांगरा ) हा सर्वात प्रभावी, पराक्रमी, शूरवीर आणि क्रांतिकारक होता.
पेशवाई बुडाल्यानंतर( १८१८ ) इंग्रजांनी महादेव कोल्यांचे सह्याद्रीतील किल्ले, घाट माथे राखान्याचे आधिकार काढून घेतले. किल्ल्यांच्या शिलेदारया काढल्या. बुरुज नस्ता केले. वतनदारया काढल्या. पगार कमी केले. परंपरागत आधिकार काढून घेतल्याने महादेव कोल्यान मध्ये मोठा असंतोष निर्माण जाला. सन १८२८ मध्ये शेतसारा वाढविन्यात आला. सारावसुलीमुले गोरगरीबांना आदिवासींना रोख पैश्याची गरज भासू लागली. ते सावकार , वान्यांकडून भरमसाठ दराने कर्जे घेऊ लागले. कर्जाच्या मोबदल्यात सावकार जमिनी बालकाऊ लागले. लोक भयंकर चिढले. सावकार आणि इंग्रजांविरुद्ध बंडाला त्यांनी सुरुवात केली. बंडखोर नेत्यांनी या बंडाचे नेतृत्व केले.
अकोले तालुक्यातील रामा किरवा याला पकडून नगर येथील तुरुंगात फाशी देण्यात आली ( १८३० ). यातून महादेव कोळी जमातीच्या बंडखोरांत दहशत पसरेल, असे इंग्रजांना वाटत होते. रामाचा जोड़ीदार राघोजी भांगरे याने सरकारविरोधी बंडात सामील होऊ नए यासाठी त्याला मोठ्या नोकरीवर घेतले. परंतू नोकरीत पदोपदी होणारा अपमान आणि काटछाट यामुले राघोजी चिढ्ला. नोकरीला लाथ मारुन बंडात उडी घेतली. उत्तर पुणे व नगर जिल्ह्यात राघोजी आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरु जाला. १८३८ मध्ये रतनगड आणि सनगर किल्ल्यांच्या परिसरात त्याने बंड उभारले. कैप्टेन मकिन्तोशने हे बंड मोडन्यसाठी सर्व अवघड खिंडी, दरया, घाट, रस्ते, जंगले याची बारीकसारीक माहिती मिल्विली. बंडखोरांची गुपिते बाहेर काढली. परंतू बंडखोर वरमले नाहीत . उलट बन्ड़ाने व्यापक रूप धारण केले.इंग्रजांनी कुमक वाढवली. गावे लुटली. मार्ग रोखून धरले. ८० लोकांना कैद दहशतीमुले काही लोक उलटले. फंदफितुरीमुले रघोजीचा उजवा हात समजला जाणारा बापूजी मारला गेला. रघोजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने ५ हाजारांचे बक्षीस जाहीर केले.
ठाणे गाजेटियर्स जून्या आवृतित "ओक्टोम्बर१८४३ मध्ये राघोजी मोठी टोली घेऊन घाटावरुन खाली उतरला आणि त्याने अनेक दरोडे घातले" असा उल्लेख आहे. राघोजीने मार्वाद्यानवर छापे घातले. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. ठावठिकाना विचारायला आलेल्या पोलिसांना माहिती न दिल्याने चिडलेल्या पोलिसांनी आईचे निर्दयपणे हाल केले. त्यामुले चिडलेल्या रघोजीने टोली उभारून नगर ओ नाशिक मध्ये इंग्रजांना सालो की पालो करून सोडले. हाती लागलेल्या प्रत्येक मारवाड्याचे नाक कापले.राघोजीच्या भयाने मारवाड़ी गाव सोडून पलाले" असा उल्लेख अहमदनगरच्या गाजे टियर्स मध्ये सापडतो.
सातारयाच्या पदच्यूत छत्रपतीनना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इंग्रजां विरुद्ध उठावाचे व्यापक प्रयत्न चालले होते त्यांच्याशी राघोजीचा संबंध असावा, असे अभ्यासकांचे मत आहे.बंडासाठी पैसा उभारने, समाजावर पकड़ ठेवणे व छल करणार्या सावाकरान्ना धडा शिकविने या हेतूने राघोजी खानदानी वसूल करीत असे. राघोजीच्या बंडा नंतर सुमारे पंचवीस वर्षांनी वासुदेव बलवंत फडके यांचे बंड सुरु जाले.नोव्हेंबर१८४४ ते मार्च १८४५ या कालात राघोजीचे बंड शिगेला पोहचले होते. बंड उभारल्या नंतेर रघोजीने 'आपण शेतकरी, गरीबांचे कैवारी असून सावकार व इंग्रज सरकारचे वैरी आहोत ' अशी भूमिका जाहिर केली होती. कुटूमबातील समाजातील स्रियाँ बद्दल राघोजीला अत्यन्त आदर होता. टोली तील कुणाचेही गैरवर्तन तो खपवून घेत नसे. शौर्य व प्रमाणिक नीतीमत्ता याला धार्मिकपणाची जोड़ त्याने दिली. महादेवावर त्याची श्रद्धा व भक्ति होती. भीमाशंकर, वज्रेश्वरी, त्रिंबकेश्वर,नाशिक, पंढरपूर येथे बंडा च्या कालात तो देव दर्शनाला गेला होता.तेथे त्याला पकडले.ठाण्याला नेले.राघोजी अत्यंत स्वाभिमानी होता.त्यांला इंग्रजी अधिकाऱ्यांनी वकील मिळू दिला नाही.त्याने स्वताच बाजू मांडली.पुढे त्याला फाशी देण्यात आली.

Thursday, October 7, 2010

Sunday, September 26, 2010

हरिश्चंद्र गडावरचा पुष्पोत्सव !

हरिश्चंद्र गडावरील पुष्पोत्सव ! नुकताच हरिश्चंद्र गडावर जाऊन आलो। तसे यापूर्वी गडावर अनेकदा जाणे झाले होतेच; परंतु नोव्हेंबरनंतरच व्हायचे.यावेळी गेलो तेव्हा गडाचे निराळेच रुपडे पाहायला मिळाले.येथील 'जलोत्सव' संपतो न संपतो तोच रानफुलांच्या सुरु झालेल्या अनोख्या 'फुलोत्सवा'मुळे गडावर अक्षरश: स्वर्ग अवतरला आहे.पिवळीधमक सोनकी,शुभ्र श्वेतांबरा,आभाळी,नभाली,नीसम,विंचवी,सोन टिकली,घावटी...आणखीन कित्येक प्रकारच्या वनस्पतींचा पुष्पमळा दूरदूरपर्यंत पसरला आहे. पावसाळी धुंद वातावरण...,हिरवेकंच डोंगर-माथे...आणि या हिरवाईच्या कुशीत रंगीबेरंगी फुलांच्या गंधाने आसमंत निराळ्याच धुंदीत आहे. फुलांच्या रूपाने येथे सुरु असलेली सप्तरंगांची मनमोहक उधळण मनाला भुरळ घालते. गडावर कोणत्याही वाटेने चढाई करा.विविधरंगी रानफुलांचा गालीचा आपले प्रसन्न मनाने स्वागत करतो आहे.मुळातच 'भटक्यांची पंढरी' अशी सार्थ बिरुदावली मिरविणाऱ्या हरिश्चंद्र गडावर जाणे हा एक अपूर्व असाच अनुभव असतो.त्यातही सप्टेंबर-ओक्टोंबर महिन्यात म्हणजे आपल्या कल्पनेतील नंदनवनात जाण्यासारखेच आहे.या पुष्प-पर्वतावरील रानसम्रादनी तलम,मऊ धुक्याने आपला चेहरा झाकते आहे.मस्तवलेल्या,उनाड वाऱ्याच्या जोरदार झोताबरोबर हा घुंगट पुन्हा दूर होतो.जागोजागी दऱ्यांमध्ये कोसळणाऱ्या अवखळ प्रपातानी,निर्झरांनी आपल्या सुमधुर संगीताने गंधर्व-किन्नरांची अनोखी मैफल भरविल्यासारखे वाटतेय.त्यात वाऱ्यावर डोलणारी अगणित फुले जणू रानपऱ्यांच्या नृत्याचा भास घडविताहेत.या 'मयसभे'तील फुलांचे रंग,गंध,धुके,हिरवाई,निळाई यांचे अहिर भैरवी नाट्य आणि रंगविलास पाहून आपण विस्मयचकित होऊन जातो.' ड्याफोडील्स' पाहिल्यानंतर विल्ल्यम वर्डस्वर्थची जी अवस्था झाली तशीच निसर्ग प्रेमींची झाली नाही तरच नवल! मुळातच हरिश्चंद्र गड आपल्या अनेकविध गुण वैशिष्ट्यांनी लौकिकास पात्र ठरला आहे. योगी चांगदेवापासून निसर्गवेड्या मिलिंद गुणाजीपर्यंत अनेकांच्या मनावर या गाडणे मोहिनी घातली आहे. हरिश्चंद्राचा हा कोकणकडा म्हणजे तर येथील निसर्गसौंदर्याचा मान्बिन्दुच जणू! सृष्टीला पडलेले सुंदर स्वप्नच जणू...सह्याद्रीत अनेक कोकणकडे आहेत; पण यासम हाच!सर्वात थोरला कडा आहे तो येथील.नगर,ठाणे,पुणे या जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील हा गड म्हणजे जीव-विविधतेचा अपूर्व नमुना आहे.देशातील एक अत्यंत समृद्ध ठिकाण म्हणून याकडे पहिले जाते.सदाहरित वृक्ष-राजींची श्रीमंती अंगाखांद्यावर ल्यायलेला हा गड गिर्यारोह्काना,दुर्ग-वेड्यांना कायमच खुणवत आला आहे.गडाची ही सारी नवलाई,स्थलविशेष,पावित्र्य,शांतता आजवर अनेक अंगणी न्याहाळली होती. परंतु 'पुष्प-पर्वत' हे नामाभिदान सार्थ ठरविणारा गड अशी गडाची ओळख मला प्रथमच होत होती.... मग केव्हा येताय हरिश्चंद्र गडाच्या भेटीला...अहो बघा की, तो बोलावतोय तुम्हाला.


Thursday, September 23, 2010

हरिश्चंद्राच्या कोकणकडयाने पुन्हा दाखवले 'इंद्रवज्र!'


हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर पुन्हा एकदा दिसले दुर्मिळ 'इंद्रवज्र' ! पावसाळ्यात क्षितिजालगत आकाशात दिसणारे अर्धवर्तुळाकार इंद्रधनू आपण कितीतरी वेळेस पाहिले असेल! पण हेच इंद्रधनू गोल वर्तुळाकार दिसले तर...! काय मज्जा येईल नाही?होय! हा अत्यंत दुर्मिळ योग पुन्हा एकदा हरिश्चंद्रगडावर नुकताच जुळून आला होता ...'रानवाटा' चे स्वप्नील पवार आणि इतर दुर्गयात्री हा निसर्गाचा अनुपम सोहळा 'याची देही याची डोळा' पाहून पुरते हरखून गेले। इंद्र्वज्रची आपल्याकडे म्हणजे सह्याद्री परिसरात पहिल्यांदा नोंद केली ती कर्नल साईक्स या ब्रिटीश अधिकाऱ्याने। तीदेखील हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर! १८३५ साली।यावेळी घोड्यावरून रपेट मारीत सकाळच्या वेळेला कोकण कड्यावर गेलेल्या साईक्सला मोठे विलोभनीय दृश्य दिसले.साईक्स त्याचा घोडा,सोबतचे सारे लोक यांच्या प्रतिमाच त्याला समोरच्या ढगांमध्ये उमटलेल्या दिसल्या.सृष्टीची ही नवलाई पाहून सारेचजण चकित झाले,बुचकळ्यातही पडले. नगर जिल्ह्याच्या ग्याझेटरमध्ये ही नोंद आपल्याला आढळून येते. इंद्रवज्र म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारिक आविष्कार!त्यासाठी भौगोलिक स्थितीही तशी असायला हवी.म्हणजे कशी? तर दिवस पावसाळ्याचे असावेत। वेळ सकाळची असावी.हलका पाऊस पडत असावा आणि हरीश्चन्द्राच्या त्या अक्राळ विक्राळ कोकणकड्याकडून[पश्चिम दिशेकडून ] दाट धुके असलेले ढग यायला हवे त.उगवत्या सूर्यनारायणाची कोवळी किरणे त्यवर पडली की,पाहणारांच्या सावल्या आणि त्याभोवती हे वर्तुळाकार इंद्रधनुष्य समोरच्या दरीतून येणाऱ्या ढगांवर दिसू लागते.कड्याच्या दिशेने आपण तोंड करून उभे राहिलो की,निसर्गाचा हा अद्भुतरम्य आविष्कार आपल्यला पाहायला मिळतो.पण हा सारा नशिबाचा,योगायोगाचा भाग.मुळात हे 'इंद्रवज्र' आपल्या देशात अत्यंत दुर्मिळ आहे.'रानवाटा' चे दुर्गयात्री त्यासाठी चार वर्षापासून मोठी प्रतीक्षा करीत होते.अखेर त्यांना हे अद्भुत दृश्य पाहण्याचे भाग्य लाभले.साईक्सनंतर इतक्या वर्षांनी कोणी तरी हे इंद्रवज्र पाहिलेय...हे पाहताना ते निसर्गवेडे आनंदाने नाचू लागले...नुसते पहिलेच नाही तर आपल्या क्यामेऱ्यात बंदही केलेय... याखेरीज एका भौगोलिक घटनेचे साक्षीदार होण्याचे भाग्य त्यांना लाभले.असा हा इंद्रवज्राचा नजारा पाहण्यासाठी दर वर्षी निसर्गवेडे येथी कड्यावर डेरा टाकतात पण बऱ्याचदा हे सारे काही जुळून येत नाही. मुळातच हरीश्चंद्रगड निसर्ग सौंदर्याने नटलेला.जीव-विविधतेबाबत तर देशभरातील उल्लेखनीय ठिकाणापैकी एक असलेला.सह्याद्रीत अनेक कोकांकडे आहेत परंतु इथल्या कड्याला तोड नाही,म्हणजे 'यासम हाच...!' इथल्या सौंदर्याचा मानबिंदूच जणू...! त्यात येथे पुन्हा एकदा हरिश्चंद्र गडाने हा अलौकिक देखावा दाखवला आहे.

Saturday, July 3, 2010

रंधा धबधबा

नयनरम्य रंधा धबधबा

Wednesday, June 16, 2010

तुडुंब भरली भातखाचरे... कोसळू लागले धबधबे... भंडारदर्यात सुरु झाले धारानृत्य !

माहेराला आल्यागत मोसमी पाऊस आता भंडारदरा परिसरात रमला आहे. अवघ्या सृष्टीशी त्याचे गुज सुरु आहे.चैतन्याचा दाता असलेल्या पावसाने बघता बघता सृष्टीचे अवघे रुपडेच बदलून टाकले आहे.माणसाच्या चित्तवृत्ती प्रसन्न करणारी चैतन्याची सळसळ सगळीकडे जाणवू लागली आहे.कळसुबाई-हरिश्चंद्रगड यासह सह्यगिरीतील लहान मोठी शिखरे,डोंगरमाथे अनेकविध जलरंगांच्या छटांमध्ये न्हाऊन निघत आहेत.चिंब चिंब पावसाने रान आबादानी झाले आहे. नेहमीपेक्षा यंदा पाऊस तसा अगदी वेळेवर दाखल झाला.तळकोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून तो जसजसा घाटघर-कळसूबाईच्या दिशेने सरकायला लागला,तसा येथला निसर्ग चैतन्याने मोहरून गेला आहे.टपोर्या थेंबानी ओघळणारा पाऊस,धुक्यात हरवलेल्या पर्वत-शिखरांवरून झेपावणारे सहस्रावधी प्रपात,लालसर विटकरी पाण्याने तुडुंब भरलेली भातखाचरे.पठारांवर दाटीवाटीने उगवलेले बारीक -बारीक हिरवे-पोपटी गावात,भन्नाट रानवारा आणि जोडीला मस्त गारवा...निसर्गशिल्पांचे देखणे कोंदण लाभलेल्या भंडारदरा परिसरात असे हे परिपूर्ण निसर्गचित्र अवतीर्ण झाले आहे.त्यामुळे उन्हाळ्यातील रुक्ष वातावरण कुठल्या कुठे पळून गेलेय. भंडारदर्याच्या पावसाला मुळातच एक नाद आहे.लय आहे.सूर आहे...म्हणूनच त्याचे येणे अनेकांच्या दृष्टीने आनंदाचे गाणे होऊन जाते.त्याच्या येण्याची वाट अनेकजण आतुरतेने पाहत असतात.त्याच्या येण्याबरोबर येथे जलोत्सव सुरु होतो.या अनोख्या धारानृत्याचा मनमुराद आनंद लुटताना सारे सारे विसरून जातात...चिंब भिजतात....स्वताला विसरतात.असा हा ऋतू हिरवा... ऋतू बरवा...आता आपल्याला पावसाळी रानभूल घालतो आहे.खुणावतो आहे...