Thursday, May 12, 2011
वसंत ऋतुतला फुलोत्सव...
वसंत ऋतू म्हणजे चैतन्याची आनंददायी लहरच जणू.त्याच्या येण्याने अनेकानेक फुलझाडाना फुलण्याचे,उमलण्याचे डोहाळेच लागतात जणू...सध्या वसंत ऐन भरात आहे. निरनिराळ्या फुलांचा वसंत उत्सव बहरला आहे.नानाविध रूप,रंग,गंध आणि आकाराची फुले रुक्ष ,रखरखीत वातावरणात लक्ष वेधून घेत आहेत. मग भगभगीत वाटणारे वातावरण... तापलेली उन्हे हे सारेदेखील काहीसे सौम्य, शीतल वाटू लागते...काळोख्या रात्री एखादी मशाल आपले लक्ष वेधून घेते ना अगदी तशी...तशीच ही फुले आपले लक्ष वेधून घेतात अगदी दुरूनही ...
ऋतू आपली कुस बदलतो, तशी सृष्टिची रुपेही बदलत जातात.त्यांच्या लावण्य विभ्रमाचे अनोखे जग पुढ्यात येउन उभे राहते.निसर्गाच्या कुंचाल्यातून साकारलेल्या मोहमयी चित्रलिपिचे रहस्यही मग आपोआप उलगडत जाते.
हासरा,नाचरा,लाजरा,सुन्दर साजिरा अशा अनेकानेक विशेषणांनी ज्याचे वर्णन केले जाते,श्रावणाची असते तशी वसंताचीही एक साखळी असते. फाल्गुन,चैत्र अणि वैशाख हे तीन महिने म्हणजे वसंत ऋतूच्या अनेकानेक रंगानी नटलेले अणि प्रखर उन्हाने तापलेले...यातला चैत्र म्हणजे खराखुरा वसंत आत्मा...त्याच्या येण्याचे अवघ्या सृष्टिला जणू डोहाळेच लागलेले असतात..निसर्गराजा निरनिराळ्या रंगांची मुक्त हस्ते उधळण करू लागतो.
इवलाल्या पालवीच्या नाजूक-कोमल पानांनी झाकलेल्या पुष्पांनी डवरून गेलेल्या वृक्ष-लतांचे दर्शन सध्या जिकडे तिकडे घडते आहे.पाना-फुलांची ही सुकुमार शोभा सृष्टीवर अत्यंत उत्कटतेने अवतरली आहे.चैत्राच्या या पालवीचे रूपही मोठे मनमोहक असेच असते.पिंपळाची गर्द गुलाबी पाने नुसती पाहण्यातही मोठी मौज असते.तऱ्हे तऱ्हेच्या झाडांना छानदार पालवी फुटली आहे.चैतन्याची विलक्षण साक्ष ती देते आहे.या पालवीच्या सोबत अनेकाने रंगाची,रुपाची,आकाराची,सुवासाची फुले सृष्टीच्या सौंदर्यात आपल्या परीने भर घालीत आहेत.
या सगळ्यात सर्वाधिक कोण नटले आहे ? तर ती आहे घाणेरी...एरवी तिच्याकडे कोणाचे विशेष लक्षही जात नाही. पण सध्या ती अशी काही शृंगार करून बसली आहे की,नाजूक-साजूक शोभिवंत फुलांचा साज तिचे सौंदर्य वाढवतो आहे.वसंत म्हणजे घाणेरीचा साक्षात सखाच जणू...आणि आपल्या प्रियकराच्या आगमनाने ती अक्षरशः अंगाअंगाने मोहरली आहे.मधूनच येणारा खट्याळ वारा जणू तिची खोडी काढतो आहे.तिला चिडवतो आहे.कडूनिंब आपल्या पांढऱ्या तुर्यांनी लक्ष वेधून घेतो आहे.नाजूक फुलाचा शिरीष तर दुरूनच आपल्या अस्तित्वाची साक्ष देत उभा आहे.त्यचा तो घमघमाट एक मंद-धुंद सुवासिक झुळूकच अंगावरून गेल्याचे समाधान देत आहे.त्याच्या फुलांभोवती किती मधमाशा,भुंगे रुंजी घालीत आहेत.च्फ्याच्या निष्पर्ण फांद्यातून दांडोरे बाहेर पडले आहेत.काळ्या उमलताहेत.फुलताहेत. हळूहळू उभे झाडच फुलून गेलेय.त्याचा गंध पुलकित करतो आहे.
पांगारा,पळस,काटेसायर आणि चाफ्याचे पुष्पवैभव अपूर्व असेच असते.अंगार फुलल्याचा आभास हे फुले निर्माण करतात.ग्रीष्मात झलेली पानगळ...तापलेली उन्हे...ओसाड,भकास रान...वसंतातल्या पुष्प्न्रुत्याच्या रंगमंचाला पार्श्वभूमी असते ती अशी ती अशी भगभगीतपणाची... रुक्षपणाची...आणि त्यामुळेच हा रंगविलास अधिकच खुलतो...उठून दिसतो....काळोख्या रात्री एखादी मशाल आपले लक्ष वेधून घेते ना अगदी तशी...तशीच ही फुले आपले लक्ष वेधून घेतात अगदी दुरूनही ...
आंब्याच्या लांब लचक देठांना कैऱ्यांचे घ्होस लगडलेत. क्वची झाडे पाडी लागली आहेत.येता- जाता राघू या झाडांना लागलेल्या फळांवर चोच मारून ती पाडाला लागलीत का, याची खात्री करती आहेत.हे दृश्य केवळ पाह्ण्याठी एक गम्मत असते.करवंदीच्या जाळ्यांतून गोलाकार,गर्द निळी करवंदे डोकावताहेत.अंजन वृक्षाची निळाई ,नवलाई चकित करते.हळदीचा रंग ल्यायलेली पिवळ्याधमक फुलाची श्रीमंती आणि ते ऐश्वर्य मनामनाला मोहिनी घालतेय.मोगरा,जाई-जुईची सुवासिक फुले आणि रातराणीचे तुरे चांदण्या रात्रींना सुगंधित करीत आहेत.वसंतातले हे पुष्प-सम्मेलन पाहून आपण आचंबित होतो.निसर्गाने प्रत्येक झाला अलौकिकत्व बहाल केल्याची साक्ष मनोमन पटते.ही पालवी,ही फुलं आपल्याला बोलावताहेत हात पालावताहेत...
जोडीला कोकीळा 'पंचम' आळवते आहे.सारे पक्षी जणू मिलनाची गाणी गात आहेत. निसर्गाचा हा विराट खुलेपणा सारा निसर्गाविष्कार असा उघड्यावर पाडला आहे.आपल्या पुढ्यात उभा आहे.जे वसंताचे आहे त्याला चैत्रामागून येणारा वैशाख पूर्णत्व देतो.त्यामुळेच जणू चैत्रभर मुके असलेले गुलमोहराचे झाड आता आनंदभराने फुलले आहे.तांबड्याजर्द फुलांचे वेह्दक गुच्छ डोईवर घेऊन नाचते आहे.
आव्हान वसंताची भैरवी आता रंगात आलेली असते.साऱ्या चारचार सृष्टीला आता वेध लागलेत ते वर्षा राणीच्या आगमनाचे....
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment