Thursday, September 23, 2010

हरिश्चंद्राच्या कोकणकडयाने पुन्हा दाखवले 'इंद्रवज्र!'


हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर पुन्हा एकदा दिसले दुर्मिळ 'इंद्रवज्र' ! पावसाळ्यात क्षितिजालगत आकाशात दिसणारे अर्धवर्तुळाकार इंद्रधनू आपण कितीतरी वेळेस पाहिले असेल! पण हेच इंद्रधनू गोल वर्तुळाकार दिसले तर...! काय मज्जा येईल नाही?होय! हा अत्यंत दुर्मिळ योग पुन्हा एकदा हरिश्चंद्रगडावर नुकताच जुळून आला होता ...'रानवाटा' चे स्वप्नील पवार आणि इतर दुर्गयात्री हा निसर्गाचा अनुपम सोहळा 'याची देही याची डोळा' पाहून पुरते हरखून गेले। इंद्र्वज्रची आपल्याकडे म्हणजे सह्याद्री परिसरात पहिल्यांदा नोंद केली ती कर्नल साईक्स या ब्रिटीश अधिकाऱ्याने। तीदेखील हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर! १८३५ साली।यावेळी घोड्यावरून रपेट मारीत सकाळच्या वेळेला कोकण कड्यावर गेलेल्या साईक्सला मोठे विलोभनीय दृश्य दिसले.साईक्स त्याचा घोडा,सोबतचे सारे लोक यांच्या प्रतिमाच त्याला समोरच्या ढगांमध्ये उमटलेल्या दिसल्या.सृष्टीची ही नवलाई पाहून सारेचजण चकित झाले,बुचकळ्यातही पडले. नगर जिल्ह्याच्या ग्याझेटरमध्ये ही नोंद आपल्याला आढळून येते. इंद्रवज्र म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारिक आविष्कार!त्यासाठी भौगोलिक स्थितीही तशी असायला हवी.म्हणजे कशी? तर दिवस पावसाळ्याचे असावेत। वेळ सकाळची असावी.हलका पाऊस पडत असावा आणि हरीश्चन्द्राच्या त्या अक्राळ विक्राळ कोकणकड्याकडून[पश्चिम दिशेकडून ] दाट धुके असलेले ढग यायला हवे त.उगवत्या सूर्यनारायणाची कोवळी किरणे त्यवर पडली की,पाहणारांच्या सावल्या आणि त्याभोवती हे वर्तुळाकार इंद्रधनुष्य समोरच्या दरीतून येणाऱ्या ढगांवर दिसू लागते.कड्याच्या दिशेने आपण तोंड करून उभे राहिलो की,निसर्गाचा हा अद्भुतरम्य आविष्कार आपल्यला पाहायला मिळतो.पण हा सारा नशिबाचा,योगायोगाचा भाग.मुळात हे 'इंद्रवज्र' आपल्या देशात अत्यंत दुर्मिळ आहे.'रानवाटा' चे दुर्गयात्री त्यासाठी चार वर्षापासून मोठी प्रतीक्षा करीत होते.अखेर त्यांना हे अद्भुत दृश्य पाहण्याचे भाग्य लाभले.साईक्सनंतर इतक्या वर्षांनी कोणी तरी हे इंद्रवज्र पाहिलेय...हे पाहताना ते निसर्गवेडे आनंदाने नाचू लागले...नुसते पहिलेच नाही तर आपल्या क्यामेऱ्यात बंदही केलेय... याखेरीज एका भौगोलिक घटनेचे साक्षीदार होण्याचे भाग्य त्यांना लाभले.असा हा इंद्रवज्राचा नजारा पाहण्यासाठी दर वर्षी निसर्गवेडे येथी कड्यावर डेरा टाकतात पण बऱ्याचदा हे सारे काही जुळून येत नाही. मुळातच हरीश्चंद्रगड निसर्ग सौंदर्याने नटलेला.जीव-विविधतेबाबत तर देशभरातील उल्लेखनीय ठिकाणापैकी एक असलेला.सह्याद्रीत अनेक कोकांकडे आहेत परंतु इथल्या कड्याला तोड नाही,म्हणजे 'यासम हाच...!' इथल्या सौंदर्याचा मानबिंदूच जणू...! त्यात येथे पुन्हा एकदा हरिश्चंद्र गडाने हा अलौकिक देखावा दाखवला आहे.

No comments:

Post a Comment