Sunday, September 26, 2010

हरिश्चंद्र गडावरचा पुष्पोत्सव !

हरिश्चंद्र गडावरील पुष्पोत्सव ! नुकताच हरिश्चंद्र गडावर जाऊन आलो। तसे यापूर्वी गडावर अनेकदा जाणे झाले होतेच; परंतु नोव्हेंबरनंतरच व्हायचे.यावेळी गेलो तेव्हा गडाचे निराळेच रुपडे पाहायला मिळाले.येथील 'जलोत्सव' संपतो न संपतो तोच रानफुलांच्या सुरु झालेल्या अनोख्या 'फुलोत्सवा'मुळे गडावर अक्षरश: स्वर्ग अवतरला आहे.पिवळीधमक सोनकी,शुभ्र श्वेतांबरा,आभाळी,नभाली,नीसम,विंचवी,सोन टिकली,घावटी...आणखीन कित्येक प्रकारच्या वनस्पतींचा पुष्पमळा दूरदूरपर्यंत पसरला आहे. पावसाळी धुंद वातावरण...,हिरवेकंच डोंगर-माथे...आणि या हिरवाईच्या कुशीत रंगीबेरंगी फुलांच्या गंधाने आसमंत निराळ्याच धुंदीत आहे. फुलांच्या रूपाने येथे सुरु असलेली सप्तरंगांची मनमोहक उधळण मनाला भुरळ घालते. गडावर कोणत्याही वाटेने चढाई करा.विविधरंगी रानफुलांचा गालीचा आपले प्रसन्न मनाने स्वागत करतो आहे.मुळातच 'भटक्यांची पंढरी' अशी सार्थ बिरुदावली मिरविणाऱ्या हरिश्चंद्र गडावर जाणे हा एक अपूर्व असाच अनुभव असतो.त्यातही सप्टेंबर-ओक्टोंबर महिन्यात म्हणजे आपल्या कल्पनेतील नंदनवनात जाण्यासारखेच आहे.या पुष्प-पर्वतावरील रानसम्रादनी तलम,मऊ धुक्याने आपला चेहरा झाकते आहे.मस्तवलेल्या,उनाड वाऱ्याच्या जोरदार झोताबरोबर हा घुंगट पुन्हा दूर होतो.जागोजागी दऱ्यांमध्ये कोसळणाऱ्या अवखळ प्रपातानी,निर्झरांनी आपल्या सुमधुर संगीताने गंधर्व-किन्नरांची अनोखी मैफल भरविल्यासारखे वाटतेय.त्यात वाऱ्यावर डोलणारी अगणित फुले जणू रानपऱ्यांच्या नृत्याचा भास घडविताहेत.या 'मयसभे'तील फुलांचे रंग,गंध,धुके,हिरवाई,निळाई यांचे अहिर भैरवी नाट्य आणि रंगविलास पाहून आपण विस्मयचकित होऊन जातो.' ड्याफोडील्स' पाहिल्यानंतर विल्ल्यम वर्डस्वर्थची जी अवस्था झाली तशीच निसर्ग प्रेमींची झाली नाही तरच नवल! मुळातच हरिश्चंद्र गड आपल्या अनेकविध गुण वैशिष्ट्यांनी लौकिकास पात्र ठरला आहे. योगी चांगदेवापासून निसर्गवेड्या मिलिंद गुणाजीपर्यंत अनेकांच्या मनावर या गाडणे मोहिनी घातली आहे. हरिश्चंद्राचा हा कोकणकडा म्हणजे तर येथील निसर्गसौंदर्याचा मान्बिन्दुच जणू! सृष्टीला पडलेले सुंदर स्वप्नच जणू...सह्याद्रीत अनेक कोकणकडे आहेत; पण यासम हाच!सर्वात थोरला कडा आहे तो येथील.नगर,ठाणे,पुणे या जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील हा गड म्हणजे जीव-विविधतेचा अपूर्व नमुना आहे.देशातील एक अत्यंत समृद्ध ठिकाण म्हणून याकडे पहिले जाते.सदाहरित वृक्ष-राजींची श्रीमंती अंगाखांद्यावर ल्यायलेला हा गड गिर्यारोह्काना,दुर्ग-वेड्यांना कायमच खुणवत आला आहे.गडाची ही सारी नवलाई,स्थलविशेष,पावित्र्य,शांतता आजवर अनेक अंगणी न्याहाळली होती. परंतु 'पुष्प-पर्वत' हे नामाभिदान सार्थ ठरविणारा गड अशी गडाची ओळख मला प्रथमच होत होती.... मग केव्हा येताय हरिश्चंद्र गडाच्या भेटीला...अहो बघा की, तो बोलावतोय तुम्हाला.


3 comments:

  1. अरे वा. सह्याद्रिचे निसर्ग सौंदर्य आता ब्लॉगवर वाचायला मिळणार. अतिशय छान उपक्रम आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला फुललेला निसर्ग आणि उन्हाळ्याच्या सुरवातीला कुपोषित बालकांचा प्रश्‍न म्हणून या भागातील फोटो फक्त वृत्तपत्रांत पहायला मिळतात. आता या ब्लॉगमुळे सह्याद्रिचा निसर्ग सतत अनुभवायला मिळणार आहे. भाऊसाहेबांच्या या उपक्रमास शुभेच्छा. त्यांनी हा ब्लॉग सतत अपडेट ठेवावा.

    ReplyDelete
  2. khup chan watala harichandragadawaril pushpotsav

    ReplyDelete
  3. बरेच दिवसांपासून 'सह्यगिरी'वर काही वाचायला मिळाले नाही. चासकर सरांच्या कामाचा व्याप वाढला असावा. असो, वेळ मिळाला तर नक्की लिखाण व्हावे, आम्ही 'सह्यगिरी'चे विविधांगी रूप पाहायला उत्सुक आहोत.

    ReplyDelete